Thursday, July 22, 2010

ठिगळ…

वेडाच दिसतोय
केव्हाचा झालं
आकाशाकडे बघुन
चित्रविचित्र …
हातवारे करतोय
विचारलं तर हंसला
हळुच म्हणाला
ठिगळ लावतोय
फाटलेल्या आभाळाला
जमलंच तर
फसकलेल्या नितीमत्तेला
पण साला, सुई
आत शिरतच नाही
शिरली तर मागे
फिरतच नाही
म्हटलं राजा …
तुला कसं सांगु
वेड्या, फाटलेलं आभाळ
सुईने नाही,
तर कर्तुत्वाने
शिवायचं असतं
आणि गेंड्याच्या कातडीच्या
नादी लागायचं नसतं
तिथे सुया
नेहमीच हरवणार
अरे माणसं खाणारी
ही बकासुरी पोटं
तुझ्या इवल्याशा सुईने
कुठपर्यंत शिवणार
नितीमत्तेचं सोड
उभा माणुस पचवला
तरी हे ढेकर नाही देणार
विषण्ण हंसला
म्हणाला..
काय करु
हे ही सोडलं तर
पोट कसा भरु
लोक वेडा समजतात
दोन पैसे टाकुन
चालायला लागतात
काम मागायला गेलं तर
हाकलुन लावतात
शहाण्यासारखं वागलं तर
काम का करत नाही म्हणतात
म्हणुनच नेटाने
सुई चालवतोय
कधीतरी पक्का
टाका बसेल
आभाळाला नाही
निदान फाटलेलं
माझं नशिब तरी सांधेल
नाहीच जमलं
तर त्यांनी फेकलेल्या
पैशांनी, माझं
पोट तरी भरेल.

विशाल.

No comments:

Post a Comment