Monday, July 12, 2010

आठवतं तुला …?

कधीपासुन उभाय तो
वाट पाहात
तिकडुन येणार्‍या गाडीची
वळणापलिकडुन
कानावर येणारी शिटी
आतुरलेले कान
आसुसलेलं मन
आठवतं तुला ?
मीही उभा असायचो
असाच, तुझी वाट पाहात
रोमरोमात सामावलेला
तुझा तो गंध
रंध्रारंध्रातुन विरघळलेले
तुझे मोहक विभ्रम
ती धुंदी इतकी अनावर
की गाडी आली कधी
अन गेली कधी
कळलेच नाही
तुझ्या स्वप्नात हरवलेला मी
तुझं ते पुकारणं
माझ्यापर्यंत पोचलंच नाही
आता त्याची पाळी आहे
तिची हाक त्याला
ऐकु येइल ना ?
की माझ्यासारखीच
त्याचीही गाडी चुकेल ?

विशाल

No comments:

Post a Comment