Monday, July 12, 2010

गुपित…

का रुंदावली नकळत ती
प्रत्यंचा तव नयनांची
का आरक्त झाली सजणे
पाकळी तव अधरांची
हसुन उमलली कृष्णकळी
…………मी गुपित जाणिले काही.
का रेंगाळली तव भाली
लट अवखळ केशांची
का थबकली उंबरठ्यावर
पावले तुझी रेशमांची
लाजेने भिजली मुग्धकळी
…………मी गुपित जाणिले काही.
येणार आज कोणी
जाणीव ही सुखाची
डोळ्यात जी उमटली
खुण नव्या प्रीतीची
फुलून गेली स्वप्नकळी
…………मी गुपित जाणिले काही.
उमजुन आज काही
धुंदावल्या फुलांनी
कथिले अलगद सखये
गुज तुझे मम कानी
आरक्त फुलली फुलकळी
…………मी गुपित जाणिले काही.

विशाल.

No comments:

Post a Comment