Thursday, July 8, 2010

रसग्रहण : सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.


नमस्कार!
चांगले, समृद्ध करणारे, ऐकावे असे काही! मध्ये सुन्या – सुन्या मैफिलीत माझ्या …ऐकण्याचा योग आला. वाचून अगदीच राहवेना.


गाणं ऐकून कधी समाधी लागली तेच कळलं नाही! सुरेश भटांची सुरेख शब्दरचना, पं. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, स्मिता पाटीलचा जिवंत अभिनय आणि दीदींच्या सुरांचे नक्षीदार कोंदण! केवळ अप्रतिम.हजार ऑस्कर एका पारड्यात नि हे गीत एका पारड्यात! समाजातील उपेक्षीतांसाठी झटणार्‍यांच्या वैयक्तीक आयुष्यात जेव्हा वादळ उठते,
तेव्हाच्या मनोवस्थेचं वर्णन भटसाहेबांनी अचूक पकडलेय. पहा.

सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे.

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझेच जे अंतरात आहे?

कळे न पाहशी कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे!

उगीच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही,
गडे, पुन्हा दुरचा प्रवास कुठेतरी दूर जात आहे!


सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!


एकीकडे प्रगल्भ सामाजिक जाणीवा आणि जात्याच बंडखोरपणा यांचं वारं पिऊन, प्रवाहाविरुद्ध मार्गक्रमण करणारी नायिका- स्मिता पाटील. अंतर्बाह्य कोलमडून पडते, जेव्हा स्वत:चं लेकरू तिच्या आईपणाचा दर्जा हिरावून घेते. यातून येते एक प्रकारची उद्विग्नता. मनाला भूतकाळात रमवणे हाच एकमेव उपाय. आठवणींचा स्मृतीपट अल्बमच्या रुपाने उलगडला जातो. आयुष्य तरी किती वळणावळणाचं? स्मृतिपट निदान उलट फिरवता तरी करता येतो. आयुष्याचं काय? वास्तवाचे कालचक्र कुणाला उलट फिरवता आलंय म्हणा! कुटूंबाबरोबरचे साठवलेले चार क्षण आठवून स्वत:शीच कसंनुसं हसते. अर्थात तिथे असतंच कोण तिच्याशिवाय? आपला निर्णय चुकलाय याची तिला आताशा पुसटशी जाणीव होऊ घातलीय. सुखाने ओतप्रोत भरलेल्या संसाराला – नव्हे एका सजलेल्या मैफिलीला आपण मुकलोय याची कल्पना आहे. मात्र बंडखोर व अहंकारग्रस्त मन काही बधत नाही.

दुसरीकडे, अभिनयाच्या आघाडीवर, मानसिक द्वंद्वाचं स्मिता पाटीलने नितांतसुंदर अभिनय-दर्शन घडवले आहे. स्वत: निवडलेल्या मार्गावरून चालताना लागलेल्या खाचखळग्यांना, काट्याकुट्यांना तोंड देण्याशिवाय तिच्या हाती तरी काय होते म्हणा! आणि त्यासाठी दोष तरी कुणाला देणार? गतकाळाच्या आठवणीत रमणे इतकेच हाती उरते. सशक्त कथानक , सुरेश भटांचे अर्थवाही शब्द, सोबतीला पं.हृदयनाथांची भावस्पर्शी चाल आणि लतादिदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत!! हे पाणी भरले डोळे पाहून ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावत नाहीत , तो माणूसच नव्हे!!! एकदोन मोडणारे संसार या गाण्याने नक्कीच सांधले असणार, निदान माझा तरी तसा ठाम विश्वास आहे!!!
 
प्रेषक अनंता ( मंगळ, 05/05/2009 – 11:42) .

No comments:

Post a Comment