Tuesday, August 3, 2010

त्यात काय मोठंसं…….?

आजकाल ते नेहमीच येतात..
कधी बंदुका तर कधी आर्.डी.एक्स. आणतात
मंदीरं, रस्ते आणि पंचतारांकित हॉटेलं…
कधी शुटींग-शुटींग तर कधी लपा-छपी खेळतात..;
रेल्वे स्टेशन्स आणि संसदेसारख्या…
बिनमहत्वाच्या जागाही त्यांना आवडतात…
त्यात काय मोठंसं…….?

हं…पण एक गोष्ट मात्र कॉमन…
या खेळात नेहमी शोधणारेच बाद होतात !
बाद होणारे कधी शिंदे तर कधी ओंबाळे असतात…
कधी साळसकर, करकरे तर कधी कामते असतात..,
आम्ही सुन्न होतो, श्रद्धांजली वाहतो, मेणबत्त्याही लावतो…
कधी आझाद मैदानावर एकत्र येवुन आसवे ढाळतो…,
त्यात काय मोठंसं……?

मनातली सगळी अस्वस्थता लपवून…
राहुन राहुन डोके वर काढणारी भीती दाबून…
पुन्हा लोकल्सची वाट पकडतो…
भीतीपेक्षा पोट खुप मोठं असतं हे लक्षात ठेवतो…
सगळी अगतिकता मनातला मनात दडवून…
खोटं खोटं हसत…, धडधडत्या काळजानं.., आमचं स्पिरीट (?) दाखवतो…!
त्यात काय मोठंसं……..?

मोठ्या शहरातल्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा म्हणणारे…
ताठ मानेने पुन्हा आम्हाला सुरक्षा पुरवायला येतात..,
छातीचा कोट करणार्‍यांची सदोष चिलखतं हरवतात..;
आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि…
वादग्रस्त वास्तु कुणी पाडली यावर मिळून वाद घालतो,
मराठी की हिंदी यावरुन गळे पकडण्यात धन्यता मानतो…
त्यात काय मोठंसं…….?

हे असंच चालणार….
ते येत राहणार….., आम्ही बाद होत राहणार !
कधी शोकसंदेश तर कधी निषेधखलिते पाठवणार…
कधी आपलीच खाजवण्यासाठी खरमरीत इशारे देणार…
पुनश्च हरिओम.. असं म्हणत आम्ही …
“स्पिरीट” दाखवण्यासाठी नाईलाजाने कामाला लागणार !
त्यात काय मोठंसं…………?

विशाल.

No comments:

Post a Comment