Tuesday, August 3, 2010

पैंजण...

भीती वाटु लागलेय आजकाल..,
माझ्याच पायातल्या पैंजणांची !
सदोदीत पाठलाग करणार्‍या..,
त्यांच्या त्या किणकिणाटाची.
खुप हौसेने घातलं होतं आईनं…,
तिच्या फिकुटलेल्या कृश हातांनी !
वय वाढलं…., समज आली…..,
पण पैंजणांचा मोह सुटला नाही !
बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं…,
तारुण्यात आल्यावर त्यांचं…
स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं !
त्यांच्या मधुर किणकिणाटानं…
मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई…,
आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन !
पैंजण अजुनही आहे…
पण आता मन मोहरत नाही…,
आता थबकत नाहीत नजरादेखील……
राहुन राहुन वळते माझीच नजर….,
पायातल्या उदास पैंजणांकडे…,
परिस्थितीने त्यांच्यावर…
उधळलेल्या उन्मत्त, बेगुमान नोटांकडे …!

विशाल.

No comments:

Post a Comment