Tuesday, August 10, 2010

महिला दिन ...(?)

त्यांचं महिलामंडळ…
कधीचं ठाण मांडुन बसलेय…
फाटक्या “चिंधी”च्या तुटक्या झोपडीसमोर…
सरपणाला गेलेल्या चिंधीची वाट पाहात…
झोपडीत आहे तीन दगडाची एक चुल….
एक मोडकी ट्रंक आणि…
फाटक्या गोधडीवर पडलेली चिंधीची सासू…
अन तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं…
त्या म्हणे तिला जाणीव करून देणार आहेत…
तिच्या हक्कांची आणि अधिकारांची…
महिलादिनाच्या उपक्रमातला हा शेवटचा टास्क…(?)
सकाळपासुन चार क्लायंट केलेत त्यानी….
एवढा शेवटचा क्लायंट आटोपला की संपले हुश्श…..
अवघा एक बर्गर आणि पाच-सहाच इडल्या…
आणि सकाळी घेतलेला “पायनापल जुस”…बस्स…
दिड वाजलाय…
उन्हे डोक्यावर आलीयेत…
कधी एकदा फ्रीजमधली चिल्ड बिअर तोंडाला लावतेय असे झालेय…
ही “चिंधी” कुठे उलथलीय नेमकी कोण जाणे?
एक दिवस नसती गेली कामाला…
तर काय मोठेसे बिघडणार होते…(?)
किती वाट पाहायची या उन्हात अजुन…..?
………………
………………….
……………………….
पलिकडच्या उकिरड्याआड लपलेली चिंधी..
वाट बघतेय त्यांच्या जाण्याची…
या बाया काय जायाचं नाव घेत नाहीयेत..
आन दाल्ल्याने हाग्या दम भरलाय..
“काय बाय गोड धोड कर आजच्याला,
आन एक चिपटी बी आन सरपनाच्या पैक्यातुन येताना…, आबाच्या गुत्त्यावरनं….!
ती नर्सबाय सांगत हुती …
त्ये कायतरी “म्हैला दिन” का काय म्हंत्यात ते हाय म्हनं आज.

विशाल.

1 comment: