Tuesday, August 3, 2010

आणि पाय माझा घसरतो !

आजकाल कुठेही, कसाही…; पण पाय माझा घसरतो………..
सोकावलेला सहकारी नेहमी सांगतो
अंडर द टेबल व्यवहार करायला शिक
आदर्श, नितीमत्ता आणि सोकॉल्ड संस्कार
अलगद वेशीवर टांगायला शिक
मी कसाबसा स्वत: ला तयार करतो
संस्कारांना मनाच्या अंधार्‍या कोपर्‍यात कोंबतो
नेमकं तेव्हाच माझाच आरशातला चेहरा …
माझ्याकडे पाहून खुदकन हसतो …..
…………………….आणि पाय माझा घसरतो !

चालता चालता मी हजारवेळा थबकतो
रस्त्यावरची चालती-बोलती सौंदर्यस्थळे पाहून
नकळत जिव माझा कसानुसा होतो
त्यांच्याकडे पाहत मी स्वतःलाच समजावतो
परस्त्री मातेसमान हे आता विसरायला हवं
असं म्हणत स्वतःलाच फसवायला बघतो
नजरा चुकवत मान वळवून न्याहाळताना
नेमका तिथेच मला आईचा चेहरा दिसतो
……………………आणि पाय माझा घसरतो !

हाऊसफुल्लच्या रांगेत नकळत मी
कुणीतरी ब्लॅकवाला शोधायला लागतो
यम-नियमाच्या व्याख्या बदलू पाहतो
हळुच बायकोच्या वटारलेल्या डोळ्यात पाहतो
शेजारच्या रांगेतला पहिलीतला पोरगा
हातवारे करत आईला साभिनय सांगतो…
काल आम्हाला बाईंनी शिकवलं…
“भारत माझा देश आहे …….
…………………..आणि पाय माझा घसरतो !

इकडे तिकडे बघत मी ताठ मानेने पुन्हा रांग लावतो
कारण मनापासुन सांगतो….
वारंवार पाय घसरण्याचा हा अनुभव मला खुप सुखावून जातो !

विशाल.

No comments:

Post a Comment