Tuesday, August 3, 2010

आईच्यान सांगतु….


आईच्यान सांगतु….
कालच्याला १५ आगस्ट झाला
मले माझा बापुस म्हनला व्हता
१५ आगस्टला म्हनं देशाला सवतंत्र्य मिळ्ळं व्हतं !

आईच्यान सांगतु….
म्या इच्चारलं, बाबा…, सवतंत्र्य म्हंजी रं काय?
बाप म्हनला, त्येची लै मज्जा असतीया
खिशावं झेंडा लावाचा आन जय म्हनाचं, मग जेवाया मिळतया

आईच्यान सांगतु…
म्या सदर्‍याच्या खिशावर….,
रुप्पयाचा, झेंडा लावला…., टाचनीनं.
जण गण मण व्हईपत्तुर, गळ्याच्यान सांगतु…, थुकबी नाय गिळ्ळी.

आईच्यान सांगतु…..
मास्तरबी म्हनलं व्हतं आमचं
झेंडा फडकला की जेवाया मिळंल
शिळं येफर नी कुरतडलेला पेडा बगिटला…., आन भुकच मेली !

आईच्यान सांगतु…
गांधीबाबा म्हनलं व्हतं म्हनं तवाच्याला
आता म्हनं देशात रामराज येनार हाय
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!

आईच्यान सांगतु…
पंदरा आगस्टच्या सवतंत्र्याचं न्हाय म्हायीत
पन चौका चौकात बांदल्यालं बोर्ड मातुर कामी आलं
आता थंडीचं दिस येनार…, माजं पांगरुणाचं काम झालं.

विशाल.

No comments:

Post a Comment