Wednesday, September 8, 2010

आपलं कसं जमणार?

तुला नेहमीच किशोर आवडणार,
आणि मी सैगलचा दिवाणा …
माझ्या मनात मारव्याचे वेड..,
तुझ्या सतारीवर कायम मल्हार फुलणार,
आपलं कसं जमणार?

तु कायम स्वप्नांची रहिवासी
माझ्या मनात सदाचीच उदासी
तु सारखा भुप छेडणार…
मी मात्र भैरवीत रमणार…
आपलं कसं जमणार?

आज ना उद्या जमेल मला
तुझ्या विनोदावर खळखळून हसणं…
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना वाण्याचं बिल स्मरणार…
आपलं कसं जमणार?

चल, आपण एक करार करू या?
तू काही स्वप्नात यायचं नाहीस…
मी काही वास्तवात रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
आपलं कसं जमणार?

विशाल

No comments:

Post a Comment