Thursday, September 9, 2010

पाऊस कविता


प्रशांतनं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि क्रांतीला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. क्रांतीने प्राजुला खो दिला..आता प्राजुने आपली खेळी खेळली आणि साखळी जोडली ती जागु, निखिल कुलकर्णी, मीनल, संदीप कुलकर्णी यांना खो देवून.., मीनलने आपला डाव खेळला आणि साखळी वाढवायची, जोडायची जबाबदारी सोपवली अनुजा मुळे, विशाल कुलकर्णी, पाषाणभेद यांच्यावर ......

प्रशांतने दिलेले मुळ नियम...

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉग बंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....


मग करायची‌ सुरुवात?
प्रशांतचं कडवं - (भुजंगप्रयात छंद)


न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशांतने खो दिला चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

याला क्रांतीताईचं उत्तर असं..

छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

क्रांतीताईने खो दिला प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना ..

याला प्राजुने तितकंच देखणं उत्तर दिलं..वृत्तबद्ध..


तुझा खेळ देवा, कशी मी सरावू
नभाच्या सवे मी कशी सांग धावू..
सरींनो, ढगांनो, जरा घ्या विसावा
भिजूनी पहाटे नका वेड लावू
आणि हे एक असंच..

पागोळ्यातून झरले मोती
पाचूंवरती विखरून गेले..
जलधारांच्या सूर-संगमी
अभ्र सारे विरून गेले..

पहाट ओली , निसर्ग ओला
गर्द धुक्याच्या कुशीमध्ये..
कटी मेखला सतरंगांची
नटली थटली धरा इथे..


आपली खेळी खेळुन प्राजुने खो दिला जागु, निखिल कुलकर्णी, मीनल, संदीप कुलकर्णी यांना ..

यावर मीनलचे उत्तर असे आहे...
मला येणारे एकमेव छंद म्हणजे "देवद्वार छंद"
.
या छंदाच्या रचनेत प्रत्येक चरण म्हणजे ओळ सहा अक्षरांची असते. पहिल्या तीन ओळी सहा अक्षरांच्या आणि चौथी ओळ ही चार अक्षरांची. म्हणजे देवद्वार छंदाचे नोटेशन ६....६.....६.....४ असे असते. दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळीचा यमक असतोच.

तीर तो नभीचा,
रंगल्या धनुचा,
वेध अवनीचा,
घेत असे.

अशी घायाळली,
प्रिती उमलली,
काया शहारली,
अवनीची.

आता मीनलने आपली साखळी जोडली आणि पुढचा खो दिला...अनुजा मुळे, विशाल कुलकर्णी, पाषाणभेद यांना

माझे उत्तर...
वृत्त, छंद यातलं मला काही कळत नाही. मला फक्त मनात काही आलं, काही सुचलं कि ते कागदावर उतरुन काढायचं एवढं माहीत आहे .....
बेभान उधाणला वारा
थेंब टिपूर पावसाचे …
अंगणी ठरेना पाऊल
परसात धुंद मोर नाचे …

वसंत कोवळा पानोपानी
कानी सुर ते मल्हाराचे …
अतृप्त चातक पाऊसवेडा
तया आकर्षण जलदांचे …

गळू लागल्या उन्हपाकळ्या
भेदूनी पडदे ते ग्रिष्माचे …
रसरसली अन् वसुंधराही
होता आगमन हे वरुणाचे …

फुलूनी आल्या मुग्ध कळ्या
लेवूनी वसने शरदाची …
ओघळला अलवार प्राजक्त
गुणगुणतो गाणे आनंदाचे …

सुखे ओलावली वसुधा
नभ ओघळले पावसाचे …
क्षितीजापार उभा रवी
ते आमंत्रण उजळायाचे…
मी कुणाला खो देवु? सगळ्यांनाच परत पाठवतोय, कारण माझ्याकडे फारसे कुणाचे ईमेल आय्.डी. नाहीत..... तुम्हीच ठरवा कुणाला खो द्यायचा साखळी पुढे वाढवण्यासाठी ते...!

विशाल.

8 comments:

 1. अरे विशाल माझ्या ब्लॉग वर येऊन पहा.

  ReplyDelete
 2. जरुर आशाताई, मी आज पाहीला तुमचा प्रतिसाद. उशीराबद्दल क्षमस्व :)

  ReplyDelete
 3. Sunder Aahai .....
  My Blog www.sachintale.blogspot.com

  ReplyDelete
 4. Sakhi majhi janu pavasach roop.........
  sakhi majhi janu kovali dhoop.....................
  komal kaya , swarn tanu...........................
  sakhi majhi janu indradhanu............................

  ReplyDelete
 5. धन्यवाद मंडळी !

  ReplyDelete