Tuesday, October 19, 2010

चारोळी - ६

अंतरीचा ताज माझ्या
ना कुणीही पाहीला...
अश्रुंच्या यमुनातीरी,
वेदनांनी मी बांधला...!

********************************* 

माझ्या मनाने सदैव
माझ्याशी प्रतारणा केलीय
जेव्हा जेव्हा मी हसलोय
त्याने आंसवे ढाळलीत.

********************************* 

वंचनेशी माझे नाते
जन्मोजन्मीचे आहे
कधी मी नशिबाची तर
कधी ते माझी करतेय...

********************************* 

स्वप्नांच्या गावात
फक्त स्वप्नांनाच वाव
वास्तवाला तिथे
ना नाव ना गांव...!

*********************************

पाकळीचं आकर्षण तिच्यावर
रेंगाळलेला दंवबिंदू असतो
तुझी आठवण हा माझ्या
एकलेपणाचा केंद्रबिंदू असतो...

*********************************

अपेक्षा
एक रुप आशेचं
उपेक्षा
स्वरुप अनपेक्षिततेचं...

********************************* 

स्वप्ने जोपासण्यात
मन इतकं रंगून गेलं
अन सत्याला जपायचं
मात्र राहूनच गेलं....

*********************************

पाणावलेल्या डोळ्यांनाही
भरभरून वाहायचं होतं
तुला विसरतानाही...
तुझ्याच आठवणीत रमायचं होतं....

*********************************

विशाल कुलकर्णी.

No comments:

Post a Comment