Monday, October 4, 2010

Let's hope for the best !

खुदाने विचारलं बाप्पाला...
का रे बाबा, तू कुठल्या धर्माचा?
बाप्पा म्हणाला...
ये शाने, गाली देनेका काम नै!
कसला धर्म अन कसली जात रे बाबा..?
तु आणि मी काय वेगळे आहो का?

पण हे त्यांना कुठे पटतय?
तसं नाही रे बाबा...
म्हणजे बघ...
आपण सृष्टी निर्माण केली....
हो ना....., वनस्पती, प्राणी...
मग आपण माणुस निर्माण केला...!

त्या माणसानेच सगळा घोटाळा केला बघ...
बाप्पा, खुदकन हसला...
तुला सांगितलं होतं मी..
नको त्या भानगडीत पडू...
वनस्पती, प्राणी ठिक..., पण माणुस...?
हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाहीये रे बाबा !

डोक्यावर हात मारुन खुदा म्हणाला...
बघ ना..., आता ही माणसे आपसातच भांडतात...
हिंदु, मुस्लिम, शिख ..इसाई म्हणुन
नेहमी एकमेकांचे गळे पकडतात...
आपण माणुस आहोत.... माणुस...!
हे मात्र सोयिस्कररित्या विसरतात....

आरशात बघत, त्या आतल्याला डिवचत
बाप्पा मिस्कीलपणे म्हणाला...
बघ रे खुदा, शब्द जपून वापर...,
नाहीतर स्वतःच्याच शब्दात अडकशील
हिंदु, मुस्लिम, शिख , इसाईंचा विचार करताना..
बौद्धांना विसरशील आणि पक्षपाती ठरशील...!

खरय रे बाबा, खरं बोललास अगदी...
परिस्थिती हाताबाहेर गेलीय खरी..
पण खरे सांगु बाप्पा...
मी अजुनही आशावादी आहे...
माणसातला माणुस जागा होण्याची वाट पाहतोय...
Let's hope for the best !

इरसाल म्हमईकर

2 comments: