Wednesday, December 22, 2010

कृतज्ञ....

नाति चरामीचा मंत्र जपत
मी तुझा हात हातात घेतला,
आई-बाबांच्या उंबर्‍याची चौकट ओलांडुन...
तु माझ्या आयुष्यात आलीस आणि वर्तुळ पुर्ण झालं!

तसा मी आधीही होतोच गं...
पण एक कबुल करायलाच हवं,
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभलं...!

सदैव पॉझिटिव्ह्-निगेटिव्हच्या...
निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी,
तुझ्या येण्याने मला लौकीकाचं भान दिलं...!

तु मला काय काय दिलंस ?
याचा हिशोब करणं सोडून दिलय मी,
तसंही तारे मोजणं नाहीच जमलं मला कधी ...!

मान्य आहे मला पुर्णपणे...
अगदी तुही स्वयंभू नाहीयेस ते, पण...
तुझ्या असण्याने माझ्या असण्याला ’अस्तित्व’ दिलंय...!

खरं सांगु..., अगदी मनापासुन...
लोक भलेही तूला माझी अर्धांगी म्हणोत...
पण माझ्यासाठी मात्र तू माझं पुर्णत्व आहेस...!

विशाल

2 comments:

  1. खूप सुंदर विशालदादा..

    ReplyDelete
  2. मन:पूर्वक आभार, मीनल :)

    ReplyDelete