Friday, February 4, 2011

जुनेच सोबती तरी नवीन डाव रंगला....

सखे कसा जुनाच हा पुनश्च आव रंगला
जुनेच सोबती तरी नवीन डाव रंगला....

सदैव आरशात मी स्वत:स पाहतो पुन्हा
मलाच मी विचारतो, कुणात भाव रंगला?

सुखात आज शोधणे जुन्याच वेदना नको
नवी सुखे, जुन्या व्यथांत हा स्वभाव रंगला

तसे नवेच हे ऋतू, नवीन भासते धरा
उन्हेच का जुनी जरी नवा प्रभाव रंगला?

विचार हे मनातले जुने, जुन्याच कल्पना
कळे न आज का असा नवा उठाव रंगला?

......................

जुने सवंगडी, जुनेच खेळ, पद्धती जुन्या,
नवीन सावजासवे नवा सराव रंगला!

विशाल

No comments:

Post a Comment