Friday, April 8, 2011

बदनाम पहिल्यासारखा - तरही

********************************************************
नाही जमाना राहिला निष्काम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा

वागेन पुंडासारखा आता पुन्हा मी लोकहो
आहे अजूनी तोच मी बदनाम पहिल्यासारखा

कंटाळलो सांभाळता माझेच हे थोतांड मी
सोडेन खोटी नम्रता, उद्दाम पहिल्यासारखा

आता नको मोठेपणा मिरवायला खोटारडा
पुन्हा जुना वाटेन मी बेफाम पहिल्यासारखा

जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा

उरली न चिंता जिंकण्याची हरवले मोहास मी
माझा न मी माझ्यातही सुतराम पहिल्यासारखा

का घाबरू मी दर्पणा नाहीच केलेला गुन्हा
वेड्या विशाला, "वाग आता ठाम पहिल्यासारखा!"

********************************************************
वृत्त - मंदाकिनी
काफिया - श्रीराम, आराम, बदनाम, उद्दाम, बेफ़ाम, परिणाम, सुतराम, ठाम
रदीफ - पहिल्यासारखा
अलामत - आ
लगावली - गागालगा गागालगा गागालगा गागालगा

विशाल कुलकर्णी

2 comments: