Tuesday, May 24, 2011

रवीवारची शाळा

जंगलातल्या गावी एकदा
रवीवारची भरली शाळा
हिरमुसलेली पिल्ले बघूनी
बाई म्हणाल्या...खुप खेळा !

वाराकाका गातो गाणी
कोरस देती झाडे-वेली
पाऊसदादा ठेका धरतो
नाच करतसे खारुटली...

ससुल्यादादा सराव करतो
फेर्‍या मारीतो डोंगरावरी
कासवभाऊ खुदकन हसले
माझाच पहिला नंबर तरी...

फुलपाखरे इवली इवली
बागडती आनंदे फुलांवरी
सुट्टी-बिट्टी नकोच मजला
मधमाशीताई व्यस्त भारी ...

कामात गुंतले गाढवदादा
बाई वाटती बिस्कीट पुडे
चुकार कोल्हा आळशी कुठला
डोळा त्याचा बस खाऊकडे...

हत्तीदादा खुतून बसले ...
एवढेसे मज कसे पुरावे?
दिला तुला जर सगळा खाऊ
इतरांना मग काय उरावे?

नेहमीप्रमाणे उशीरा आले
मनीमाऊ आणि वाघभाऊ
रुसून बसले कळले जेव्हा
संपून गेला सगळा खाऊ...

चला मुलांनो शाळा सुटली
सांगत-सांगत संध्या आली
पुन्हा भेटूया उद्यास म्हणूनी
दमलेली पिल्ले घरी पळाली...

विशाल...

2 comments:

  1. मस्त...लहान होऊन कविता करण्यात आणि वाचण्यात वेगळाच आनंद आहे.

    ReplyDelete