Tuesday, May 24, 2011

सिंधुमाई...

**************************************

पदर कर्णा पसर आता, दान देई सिंधुमाई
या जगाची माय झाली, माय माझी सिंधुमाई

लाजलेले क्रौर्यही.. अन् लाज वाटे वेदनेला
दु:खही नि:शब्द त्यां आव्हान देई सिंधुमाई

जन्मदाते त्याग करती जीव लावे माय भोळी
फाटलेल्या अंबराला ठिगळ होई सिंधुमाई

होतसे दुर्गा भवानी, शारदा होते कधी ती
शायरीला सांगते अन् आपबीती सिंधुमाई

जा जगाला सांग आता गरज नाही देवतांची
दु:खितांचा देव झाली आदिशक्ती सिंधुमाई

**************************************
विशाल...

No comments:

Post a Comment