Thursday, July 21, 2011

रात्रीस काय झाले?

*************************************************

त्या धुंद पावसाळी रात्रीस काय झाले?
धुंदावल्या दिशाही, रात्रीस काय झाले?

प्रौढी कळ्यांस होती त्यांच्या कुवारतेची
झाली फुले कळ्यांची, रात्रीस काय झाले?

बहरून काजव्यांनी तेजाळली धराही
लाजून चंद्र गेला, रात्रीस काय झाले?

मी पाहिली धरेची शोभा भल्या पहाटे
रात्रीत काय चाले? रात्रीस काय झाले?

पायास स्पर्श ओला नाजूकसा दंवाचा
की आंसवे निशेची? रात्रीस काय झाले?

अंधार दूर होता, दारात सूर्य आला
ती धुंदली कशाने? रात्रीस काय झाले?

ती एकटीच जागी, विश्वास सौख्य द्याया
निजली भल्या पहाटे, रात्रीस काय झाले?

****************************************************
वृत्त : आनंदकंद
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा

विशाल...

No comments:

Post a Comment