Monday, August 8, 2011

हाय माझ्या पातकांनी जाळले होते मला...

*******************************************

आसवांनी कालही सांभाळले होते मला?
आरशाने मात्र का हेटाळले होते मला?

वादळे झेलून सारी प्राण माझे झुंजले
संकटांनी माय होवुन पाळले होते मला

हात जोडुन सिद्ध होते दैव माझ्या अंगणी
हाय माझ्या पातकांनी जाळले होते मला

मी न धरला अंतरी विश्वास थोडासा कधी
संशयाने नेहमी कवटाळले होते मला?

काल ही मी तोच होतो, आज नाही वेगळा
आठवांनी आज सार्‍या गाळले होते मला

***************************************
वृत्त : कालगंगा

विशाल...


No comments:

Post a Comment