Wednesday, August 10, 2011

काय झाले दु:ख आम्हा भावले... (तरही)


************************************

चांदणे आहे खरे की भास नुसता?
सोकलेल्या जाणिवांचा त्रास नुसता

शामियाना बांधला होता सुखांचा
आज भासे तो मला हव्यास नुसता

भोगले जे दु:ख तोही भास होता
त्रास देतो भास ही हमखास नुसता

जानकी अन उर्मिला झाल्या पुराण्या
प्राक्तनी माते तुझ्या वनवास नुसता...

संपली सारी व्यथा, काही न बाकी
सोबतीला कोरडा नि:श्वास नुसता

काय झाले दु:ख आम्हा भावले..., मग?
का तुम्हां तो वाटला आभास नुसता?

आज गझले जन्म झाला वेदनेचा
की विशाला जन्मला उपहास नुसता?


************************************
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास, त्रास्, हव्यास, हमखास, वनवास, नि:श्वास, आभास, उपहास
लगावली : गालगागा गालगागा गालगागा


विशाल...!

No comments:

Post a Comment