Thursday, August 25, 2011

जगावेगळे....

***********************************

जगावेगळे मागणे मागतो मी
तुझी याद नाही विसर मागतो मी

स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही
तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी

नको शाश्वती जीवनाची दयाळा
हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी

किती आजवर मीच केलीत पापे
नको श्वास आता, अभय मागतो मी

इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे
जमावे मला वाकणे.., मागतो मी

नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची
'हरामीपणा' थोडका मागतो मी

जगाला कळेना विनंत्या मनाच्या
विषाचाच जहरीपणा मागतो मी

कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'?
जगावेगळ्या मागण्या मागतो मी !

***********************************

विशाल...
No comments:

Post a Comment