Thursday, September 22, 2011

काळजावर मोगर्‍याचे वार झाले

***************************************
आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले

दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले

देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले

भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?

आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्‍याचे वार झाले

वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(मंजुघोषा)

विशाल

No comments:

Post a Comment