Thursday, May 3, 2012

वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे?
मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे?

करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या?
वगळून आशयाला चालेल का कधी रे?

नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले
दगडात देव आहे वाटेल का कधी रे?

खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची
सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे?

टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा
वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

व्हावे विशाल आता, कोतेपणा गळावा
वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे?

विशाल...

2 comments: