Tuesday, May 29, 2012

स्वागतासाठी तुझ्या, मरणा पुन्हा आलोच आहे

कालचा मी तोच होतो आजही मी तोच आहे
अन् तुझ्या लेखी कधीचा वेगळा झालोच आहे

वाहतो आहे कधीचा एकटा ओझे सुखांचे
संपते ना दु:ख येथे, जीवना ही खोच आहे

गालिचे ताज्या फुलांचे भोवताली पसरलेले
मोह ना त्यांचा मला काट्यातुनी गेलोच आहे

वाळवंटे जीवनाची पार करता संपलो मी
स्वागतासाठी तुझ्या, मरणा पुन्हा आलोच आहे

यार थकल्या वादळाची झुंज आहे ही स्वतःशी
थांबण्याची सोय नाही हीच मोठी बोच आहे

मी न उरलो आज माझा, ना कधी झालो कुणाचा
संपले अस्तित्व माझे शून्य मी झालोच आहे

विशाल...

1 comment: