Sunday, February 24, 2013

घेतला तर श्वास वेड्या...

**********************************

मोजके आयुष्य आणिक आठवांचा त्रास आहे
आज माझ्या वेदनेला लाघवी सहवास आहे

हात हाती घेतला, तेव्हा हसावे लागलेले
साथ आता आसवांची जाणिवांना खास आहे

तो तुझा रस्ता असावा, वाट माझी संपलेली
तू पुन्हा येशील परतुन आस ही हमखास आहे

हरवल्या बघ सावल्याही, एकटा पडलोय आता
झोंबणारे श्वास त्यांचे..., गारव्याची आस आहे

आसमंती दरवळावा, का विखारी मोगराही...?
आजही वेड्या मनाला आर्जवी गळफास आहे

विसरणे का शक्य नाही? सांग ना तुजला 'विशाला'...
घेतला तर श्वास वेड्या..., सोडता नि:श्वास आहे !

************************************

वृत्त : व्योमगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा
काफ़िया : त्रास, सहवास, खास, हमखास, आस, गळफ़ास, नि:श्वास
रदीफ़ : आहे

विशालNo comments:

Post a Comment