Friday, March 22, 2013

तोकडे आकाशही व्हावे कदाचित...

***************************************

लाज त्याने सोडली आहे कदाचित
भान आले आज जगण्याचे कदाचित

तोडण्या नाते स्वत:शी सज्ज झाला
वेध त्याला पैलतीराचे कदाचित

उंबर्‍याचे लाड आता फार झाले
तोकडे आकाशही व्हावे कदाचित

मुक्तता का आज वाटावी हवीशी?
कैद श्वासांची अता बाधे कदाचित?

मोक्षप्राप्तीची न आहे आस आता
सत्व आयुष्या तुझे कळले कदाचित

शोधणे माझे नव्याने अर्थ त्याचा
भावलेले जीवना आहे कदाचित !

***************************************


वृत्त - मंजुघोषा
गालगागा गालगागा गालगागा

विशाल...


No comments:

Post a Comment