Sunday, March 30, 2014

अगा पांडुरंगा ...



किती आळवावे स्मरावे तुला मी पुन्हा चित्त बेभान व्हावे अता
भुलावे जगाचे किती पांडुरंगा मनाचे मला भान व्हावे अता

नसे शुद्ध गंगा न पावन किनारे नको मोक्ष आता नको स्वर्ग ते
तुझ्या उंबर्‍याचा मिळो कोपरा ’मात्र’ जगणेच आख्यान व्हावे अता

पुन्हा देहकोशी धुमारे फुटावे किती पापणीने लवावे पुन्हा
तुला मी पहावे भजावे पुजावे, जळो दंभ हा, ज्ञान व्हावे अता

नको चंद्रभागा न भीमा हवी मज उराशी हवा वेदनाडोह तो
तुझे स्पर्श माझ्या अभंगास जैसे सुखाचेच सोपान व्हावे अता

मला भावते ती जनी नामयाची सखी भाबडी रे तुझी सावळ्या
भले ती अडाणी..., तिची एक ओवी, झणी दूर अज्ञान व्हावे अता

नसे मी तुकोबा, नसे मी विसोबा, नसे भक्त गोरा विठू मी तुझा
भिकारी प्रभो मी तुझ्या पायरीचा असे आस ’उत्थान’ व्हावे अता

जरी सर्व देतोस पृच्छेविना तू तरी आर्त माझ्या मनी ते उरे
पुन्हा मागणे मागतो हे अनंता जगाचेच कल्याण व्हावे अता

वृत्त : सुमंदारमाला
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

विशाल

No comments:

Post a Comment