Monday, April 21, 2014

इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

***********************************

आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या
येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या

खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

येती कितीक येथे मशहूर रोज होती
गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या

लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला
विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या

झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा
लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या

माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले
आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या

***********************************

विशाल ...

No comments:

Post a Comment