Tuesday, April 29, 2014

पाठ फिरता बोलती तो पोर आहे ...

***********************************************
लागला माझ्या जिवाला घोर आहे
भेटतो जो जो इथे तो चोर आहे

रंगला ना सावळ्याचा रास येथे
कंस इथल्या गोकुळी शिरजोर आहे

विठ्ठला सोडा कटीचे हात आता
का ’बळी’च्या गर्दनी तो दोर आहे

सांगतो रस्ता मला थांबू नको तू
अडथळ्यांचा मात्र थोडा जोर आहे

भेटल्यावर सुज्ञ ते म्हणती मलाही
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

बोल का हो लावता त्या सावल्यांना?
दाटला अंधार हा घनघोर आहे

हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !
***********************************************

विशाल

No comments:

Post a Comment