Monday, June 2, 2014

अर्घ्य



झळ उन्हाची येते लेवून
गतकाळातील 'आठवकळा'
ते दिवस नेटके होते अन रात्री उलगडलेल्या...

मी तुला, तू मजला ...
हलकेच पुन्हा आठवतो
विस्मृतीच्या क्षणांसाठी कण कण साठवतो ....
           
हळुवार पुन्हा मी हसतो
त्या हसण्यावर ती रुसते
बट केसांची नकळत, त्या गालावर रस्ता चुकते

तो थेंब चिंब ओलेता ...
हलकेच चुकार ओघळतो
मी शुष्क कोरडासा , तो मला भिजवूनी जातो

प्राजक्त कधी परसातला
खांद्यावर ठेवतो डोके
दरवळताना जाई-जूई, हळुच घेती व्याकुळ झोके

तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा
हृदयाशी गुजगोष्टी करतो
विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्ध्य' देतो .

विशाल

No comments:

Post a Comment