Friday, August 8, 2014

तांडव

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

उघड नयन शुष्क तुझे, धास्तावली धरा प्रभो
आज साक्ष लोक तिन्ही, असशी निद्रिस्त तू
तांडव तू करशी असे हतप्राय सकल विश्व हे
स्तब्ध तो भास्कर नभी, का जाहला संतप्त तू

विकासाचा डाव मांडता निसर्ग आम्ही भरडला
सुटला संयम, तुटले नाते, हाहाकार इथे माजला
अपराध काय झाला ? पुसती ते नेत्र रुद्ध आता
कोसळले आभाळ शिरावर, आनंदे मृत्यु नाचला

घडले अक्षम्य किती, गुन्हे जरी माणसाकडूनी
का सुटला रे नकळत, असा तोल तुझा अनंता
किं परमावधी तुझ्या ही, प्रभो सहनशीलतेची?
का सुटले संतुलन निसर्गाचे, कोपले दैव आता

संपले अस्तित्व, श्वासही उडाले हलकेच अंबरी
मोकळ्या दाही दिशा, अन सैरभैर झाले पक्षी
अंतरलो स्वजनांस अवघ्या, सर्वस्व कीं हरवले
हे जगन्नियंत्या, का उरले अजुनी प्राण या वक्षी ?

विशाल...

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete