Sunday, December 7, 2014

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा
दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा

धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा
भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा

भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले
वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा

करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी
घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला
भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा?

घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू
सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा !

विशाल

No comments:

Post a Comment