Wednesday, July 1, 2015

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

फसवले काळासही मधुमास होते भोगले
जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले

राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला
जानकीने का इथे वनवास होते भोगले ?

दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना
सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले

पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी
प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले

रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली
यार, फसलेले किती अदमास होते भोगले

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?
स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले


वृत्त : कालगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास
रदीफ़ : होते भोगले

No comments:

Post a Comment