Sunday, July 26, 2015

शुष्क



आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता
बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला
झाली उजाड़ स्वप्ने सत्यास दंभ होता
चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी

रक्तास चटक ओल्या लागून आज गेली
जखमाच त्या, तयांशी...संसार थाटलेला
अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली
त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी

होता तसाच आहे ओसाड माळ तिथला
पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला
मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला
गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी

झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले
तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला
तो बहर बेगडी होता फसवेच गंध झाले
ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी

विशाल कुलकर्णी

1 comment: