Tuesday, August 25, 2015

नियतीआयुष्य मागते काहीं
रखरखाट तप्त कुठेसा
त्या रस्त्यावरती ओला
तो थेंब शुष्क रुधिराचा

भिरभिरति नकळत डोळे
शोधी आधार छताचा
ते खांब चारच होते
ना मागमुस भिंतीचा

सुकलेल्या ओष्ठांना हलके
स्पर्श तप्त अश्रुंचा
थांबले गालांवर मोती
ओघळला श्वास कोरडासा

त्या श्वासांमधले अंतर
मोजण्यापल्याड असते
मी फ़क्त मोजतो श्वास
अन्तरही फसवे असते

जगणे बुभुक्षिताचे
भूक संपता संपत नाही
ते स्वप्न शोषिती माझे
शोधती सत्य आभासी

ते दिवे दूर जाताना
सावली सोडते साथ
बांधू पाहतो नशिबा
पाठीवर बांधुनी हात

ते दिवस कोडगे होते
रात्री लाजिरवाण्या
स्वप्नांचे इमले इतुके
विश्वास बाटगा होता

ती हलके हलके हसते
ते नकळत मीही जगतो
ते जगणे सुगंधी होते
मी जगण्यावरती हसतो

विशाल

1 comment: