Tuesday, December 15, 2015

सॅचुरेशन पॉइंटएक सूर्य
चांदण्या रात्री संथ जलाशयात
खड़े मारत बसलेला दिसला
'रस्ता चुकलायस का मित्रा?'
त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले
म्हणाला ...
कंटाळा आला राव !
रोज रोज पूर्वेकडे उगवायचं
स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं..
रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु
ते काय म्हणता तुम्ही?
संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा
काहीतरी नवीन..
काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा
एखादी हळुवार कविता ऐकावी
एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं
अगदीच काही नाही तर
गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी
आणि मग...
शांतपणे पाण्यावर उठणारे तरंग पाहात बसला
एक विलक्षण शांतता..
वाऱ्याची नाजुकशी सळसळ
अचानक कुठुनतरी पाखरांची किलबिल कानी आली
आणि गडबडून उठला बिचारा...
जातो मित्रा, अप्रेजलची वेळ झाली
"तुलाही अप्रेजल मिळते?"
हळुवार हसला, म्हणाला..
रोजची सकाळ इथे कुणा ना कुणासाठी
एक आशेचा किरण घेवून येते रे
त्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हेच माझं अप्रेजल
तुला वर्षातून एकदाच मिळतं
माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही
तेवढेच काय ते सुख !
पूर्वा पुन्हा उजळायला लागली होती ...

विशाल 

No comments:

Post a Comment