Tuesday, May 24, 2016

जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ...



मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता
डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता

भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले
आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता

मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी
जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता

ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने
पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता

कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची
'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता

विशाल 

No comments:

Post a Comment