Tuesday, May 24, 2016

निळाई***************

नजर पोचते जिथवर तितके
निळ्या नभाशी निळेच पाणी
पाण्यात सोडूनी पाय बैसली
निळावती ती कुणी जलराणी

मित्र पांघरे निळीच दुलई
निळे व्योम अन निळी धरा
सभोवार फाकली निळाई
निल नभांगणी निळा झरा

मंद निळाई शुभ्र निळाई
निळा होय कातळ काळा
जळी कोरडे कमळ निळे
वात्सल्याचे गोत ही निळे

गात्रांत उमलला बहर निळा
निळी बासरी सावळ कान्हा
हृदयी पाझरे पाझर निळा
माय वत्सल निळाच पान्हा

विशाल कुलकर्णी
१६.३.२०१६

No comments:

Post a Comment