Tuesday, May 24, 2016

महाराष्ट्र माझा ...

नकोच आम्हा चौकट कुठली
नकोत आता कुठल्या सीमा
जो जो येई तो होई आपला
सज्ज स्वागता प्रत्येकाच्या महाराष्ट्र माझा

कुणी बिहारी, कुणी मद्रासी
कुणी भय्या युपीचा
बंगाली कुणी, कुणी गुजराती
सामावून सकळा घेई आनंदे, महाराष्ट्र माझा

बलिदाने कित्येक पाहिली
हौतात्मे ती सुखे मिरवली
माती सोशिक सह्याद्रीची
शौर्य पिकवतो अभिमानाने महाराष्ट्र माझा

शिवबाचा, बाजीप्रभूंचा
टिळक, आगरकर, ज्योतिबांचा
बंग, आमटे, सिंधुताईंचा
परंपरा समृद्ध मिरवतो हा महाराष्ट्र माझा

अनेक रूपे भाषेची येथे
अगणित साज मराठी ल्याली
हवा कशाला गर्व व्यर्थ हो
सांगे अर्थ सहिष्णुतेचा महाराष्ट्र माझा

इथल्या दरीखोऱ्यात नांदतो
समीर अवखळ स्वातंत्र्याचा
सुटे कधी ना आत्मभान परी आदर सर्वांचा
स्वातंत्र्याचे मर्म शिकवतो महाराष्ट्र माझा

हा महाराष्ट्र माझा ...

विशाल # १७.४.२०१६

No comments:

Post a Comment