Saturday, June 17, 2017

मी एक शून्य ...मी तरी माझा मलाच कोठे उमगलो होतो
जगण्याने केला दावा त्याला कळलो होतो
कधी गुफ्तगू स्वत:शी कधी बोलका अबोला
जगण्याने केली थट्टा त्याला नडलो होतो

कधी क्षुब्ध दुष्काळ तो निःशब्द जाणिवांचा
बकवास त्रस्त भावनांची ऐकुन चिडलो होतो
रस्ताही पेटुन उठतो दिशांच्या कोडगेपणावर
मी आंधळा प्रवासी उगाच घुटमळलो होतो

आयुष्य उभे दारी मागते भीक कुण्या सुखाची?
मी भिकारी शाश्वताचा त्याच्यावर हसलो होतो
सोडले भान केव्हाच त्यागली लाज आसवांची
हसतानाही जगण्यावर.., मी उगाच रडलो होतो

नच उरलो आता मी निमित्त सांगण्यापुरताही
क्षतविक्षत झालो अन मातीत विखुरलो होतो
हा शोध संपतो अंती शुन्याच्या अवशेषापाशी
आरंभापाशी सदैव त्या मी अडखळलो होतो

© विशाल विजय कुलकर्णी

No comments:

Post a Comment