Monday, June 26, 2017

निळा प्रवासी



अजाण पक्षी सुजाण वारा
उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा
चुकवून अव्यक्तांच्या नजरा
उनाड पाऊस, अवखळ गारा

काळ्या डोही कातळपाणी
हिरवे असुनी रान अधाशी
वेशीवरती उभा थबकुनी
अवकाशीचा निळा प्रवासी

गंध मातीचा, धरा बहरली
पानोपानी ओजही सजले
डोळ्यांत कुणाच्या नीर निळे
हिरव्या तेजाने डोळे निवले

ये रे, ये रे ... अनंत याचना
जलदांचे अवगुंठन सरले
कोसळू लागल्या रेशिमधारा
धरतीचे मग 'मी'पण सुटले !

© विशाल विजय कुलकर्णी

No comments:

Post a Comment