Tuesday, November 14, 2017

अहेवपण ...



कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास

उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो

नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ

पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment