Friday, June 22, 2018

विरक्त



आठवतं का रे तुला?
माझ्या परसातलं
ते वेडं
काहीसं एकाकी
चाफ्याचं झाड
एखाद्या ...
विरक्त संन्याश्यासारखं
पांढऱ्या शुभ्र फुलांनी लगडलेलं
तिथेच ...
हो, अगदी तिथेच
नव्याने भेटलेलास तू मला
तुझ्या विस्तीर्ण ओंजळीत
त्याची धवलपुष्पे गोंजारताना
खालमानेनंच, हळुवारपणे म्हणालास
"का गं ?
असं एकट्यालाच का ठेवलंयस या वेड्याला?"

नक्की कोण वेडं होतं कुणास ठाऊक?
तो चाफा कीं तू ..?
कीं .... मीच !
तुझे शब्दांचे खेळ ...
कधी कळलेच नाहीत बघ मला.
मला आपलं उगाचच वाटायचं
एकटा कसा असेल तो?
ती लाली कण्हेर आहे, मोगरा आहे
झालंच तर येता-जाता
रुबाब दाखवणारी रातराणी आहे
एकटा कसा असेल तो?
मग कधीतरी तूच
त्या मधुमालतीला घेवून आलास
आणि दिलंस सोडून त्याच्या अंगावर !

खरं सांगू ...
वेडा तर तूच आहेस
जोड्या लावणं कधी जमलंच नाही तुला
आठवतं? शाळेत सुद्धा ...
'जोड्या लावा' असा प्रश्न आला..
की बाईंची नजर चुकवून माझ्याकडे पाहायचास
तुला प्रश्नाचं उत्तर हवं असायचं
आणि मी ? वेडी उगीचच मोहरून जायचे

मला सांग ,
वेशीवरच्या संन्याश्याची जोडी
रंगमहालातल्या ...
राजकन्येशी जुळते का कधी?
पण तुझे हट्टच जगावेगळे
ती जाईची वेल मात्र..
कायम एकटीच तिष्ठत राहिली
इच्छा नसतानाही उगाचच
संन्याश्याच्या ओढीने विरक्त झाली
खरं सांगू ?
तू कधी आतवर डोकावलाच नाहीस
नेहमी तीरावर, काठावरच उभा
कधी तरी विचारलंस स्वतःला?
तुला नक्की काय हवं होतं ते...

आणि काय रे...
मला नाही विचारलंस कधी?
अशी एकटीच का जगलीस म्हणून ....

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment