बहिणाबाई

"स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे
जुने पणास आजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नरीनता समावुदे !!
दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !!
नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !!

किती साधे शब्द, किती साधी रचना.. पण चराचराचं कल्याण मागणारी रचना ! जणू ज्ञानदेवाने मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच ! साधेपणा या माणसाच्या लेखनातच नव्हे तर स्वभावातही काठोकाठ भरलेला होता. अर्थात का नसावा? मुळात ते होते निसर्गकन्येचे पुत्र. या माणसाने सातवीत असताना आपली पहिली कविता लिहीली. हा माणुस उत्तम चित्रकार होता. त्याने पं. विष्णु दिगंबर पलुस्करांकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. या माणसाला "ज्ञानेश्वरी" मुखोद्गत होती. या सरळ साध्या माणसाच्या नावावर "काव्यकेतकी छंद लीलावती" सारखे सहा काव्यसंग्रह आहेत. कवी चंद्रशेखर यांनी 'महाराष्ट्र काव्य कोकीळ' ही पदवी दिली होती...! तरीही हा माणुस सदैव जगाच्या चमक चांदणीपासुन दुर राहीला....

पण या माणसाच्या हातुन यापेक्षाही मोठं असं एक काम व्हायचं होतं. एकदा हे सद् गृहस्थ काही कामानिमीत्त मुंबईत आले असता आचार्य अत्रेंना भेटायला गेले. भेटीत सहज त्यांनी खिशातली वही काढुन त्या वहीतलं एक गाणं अत्रेसाहेबांना गावून दाखवलं. साहेबांनी त्यांच्या हातातली वही अक्षरशः ओढुनच घेतली, त्यातली गाणी वाचली... आणि त्यावर त्यांची पहिली ज्ञात प्रतिक्रिया होती ...

"अहो, हे बावनकशी सोने आहे. हा खुप अनमोल ठेवा आहे. आतापर्यंत लपवुन का ठेवलात?"

तत्काळ अत्रेसाहेबांनी ती गाणी गणेश पांडुरंग परचुरे प्रकाशनातर्फे छापुन घेण्याची सोय केली. १९५२ साली ते पुस्तक बाहेर पडले आणि महाराष्ट्रातील रसिकांना एक अनमोल खजिना सापडला. खजिनाच का खरे तर त्या कवितांच्या रुपाने महाराष्ट्राला सोन्याची खाणच सापडली म्हणाना.

कारण त्या सद् गृहस्थांचे नाव होते "सोपानदेव नथुजी चौधरी" आणि त्या कविता होत्या त्यांच्या आईच्या "निसर्गकन्या" बहिणाबाई चौधरींच्या.



अत्रेसाहेब त्या कविता वाचल्यावर नक्की काय काय म्हणाले असतील माहीत नाही. पण त्यांचा एकंदर स्वभाव बघता प्रत्येक ठिकाणी ते वापरत असलेले वाक्य त्यांनी इथे वापरलं असण्याची बर्‍यापैकी शक्यता आहे. आणि बहिणाबाईंच्या कवितांच्या बाबतीत ते खरं ठरण्याची १००% शक्यता आहे. अत्रे साहेब म्हणाले असतीलही....

"गेल्या दहा हजार वर्षात अशा कविता लिहील्या गेल्या नाहीत...........
आणि मला खात्री आहे आपल्या साध्या सरळ, गावरान बोली भाषेत लिहेलेल्या कवितांमधून बहिणाबाई जे काही सांगुन गेल्या, ते सांगणारी कविता पुढील दहा हजार वर्षात जन्माला येण्याची शक्यता खुपच कमी आहे.

बिना कपाशीने उले, त्याले बोंड म्हनु नये
हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हनू नये
नाही वार्‍याने हाललं त्याले पान म्हनू नये
नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हनू नये"

या चार ओळी वाचल्यावर, ऐकल्यावर, अंगी भिनवल्यावर मला सांगा काय गरज आहे कुठल्या मंदीरात जाण्याची, कुणा गुरुचे शिष्यत्व घेण्याची. त्या जगावेगळ्या माईसाठी देवत्वाचे निकषच वेगळे होते. तिच्या लेखी देव केवळ मंदीरात नव्हता तर तो चराचरामध्ये सामावला होता. एकदा त्यांची नणंद म्हणजे सोपानदेवांची आत्या राजीबाई यांनी तिला विचारले...वैनी मी आणि तू , दोगीबी अशा अनपढ, अडाणी... मग तुला हे शिकवते कोण? त्यावर ती माऊली म्हणते....

माजी माय सरसोती मले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली
माज्यासाठी पांडुरंगा तुजं गीत भागवत
आभायात समावतं, माटीमधी उगवतं
तुज्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी
देवा तुजं येनंजानं वारा सांगे कानामधी
अरे देवाचं दरसन.. झालं झालं आपसुक
हिरिदात सुर्यबापा दावी अरुपाचं रुप !!

एक अडाणी, अशिक्षीत जिला शिक्षणाचा अजिबात गंध नाही, जिने कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, ती बाई सांगते की माझ्या हृदयात सुर्यबाप्पा येतो आणि जे सर्व सामान्यांना दिसत नाही असं त्या परमेश्वराचं निर्गुण रुप दाखवतो. नाही हो...ती कुणी सामान्य स्त्री नव्हतीच, साक्षात  आई सरस्वतीच आली होती त्या वेड्या बागड्या रुपात या अडाणी जगाला त्याच्या भाषेत जगणं शिकवायला. त्याचं जगणं समृद्ध करायला.
अत्रेसाहेबांनी ती वही जेव्हा आधाशासारखी वाचुन काढली, तेव्हा त्यातली एक कविता त्यांनी वेगळी काढली आणि परचुरेंना खास सांगितलं ही कविता सगळ्यात आधी छाप. यात शब्द, स्पर्श, रस, रुप आणि गंध हे पाची आले आहेत. ही आयेच्या मायेची आरती आहे. यात सगळ्याचं सार आलं आहे.

"अरे किती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात
माझ्यासाठी शिरिरंग, रंग खेळे आकाशात
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माज्या नाकाले इचारा, नथनीला त्याचे काय
धर्तीमधल्या रसाने जीभ नाझी सवादते
तवा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते"

साधारण १९८० च्या सुमारास मराठवाड्यातील आसोदे या गावात उखाजी महाजन या जमींदार व्यक्तीच्या घरात बहिणाईचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावातील नथुजी चौधरींशी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी नथुजींचा मृत्यु झाला. नेमके त्या आधी घरात वाटण्या झालेल्या. पदरात दोन मुले... एकटी स्त्री म्हणल्यावर साहजिकच नातेवाईकांनीही होते ते ही हिरावून घेतले. त्यात डोक्यावर सावकाराचे कर्ज. अशी संकटाची रांगच्या रांग समोर उभी असुनसुद्धा बहिणाई निर्लेप राहीली. पाण्यासारखी निर्मळ राहीली. तिच्या कवितांमध्ये कधी दु:ख, वेदना, दारिद्र्य अशा गोष्टींचा प्रभाव आढळत नाही, की परिस्थितीचे ओरखडेही आठवत नाहीत. बहिणाईचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांना प्रखर प्रतिभा तर होतीच, पण त्याबरोबरच भावात्मक दृष्टीही लाभली होती. परमेश्वरी श्रद्धा असल्याने किर्तनाची आवड होती, त्यातून एकप्रकारचा बहुश्रुतपणा लाभला होता. त्यांचा मोठा मुलगा ओंकार हा प्लेगमुळे अपंग झाला होता. त्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती शेवटपर्यंत निभावली. पण तरीही संसाराबद्दल त्यांच्या मनात कधी कटुता आली नाही की त्यांच्या कवितेतूनही ती डोकावली नाही. उलट बहिणाई सांगते...

"अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर...."

बहिणाईच्या कविता विशेषकरुन जाते, घरटे, मोट, चल, पेरणी, कापणी यांच्यात गुंतलेल्या होत्या, गुंफलेल्या होत्या. ती नेहमी म्हणे.......

"देवाची, त्याच्या पायाची चाहूल झाडांच्या पाना पानात लागते, आसमंतात फिरणारा, घुमणारा वारा देवाच्या येण्याची बातमी कानात सांगतो."

कधी कधी हिच बहिणाई विनोदाने म्हणते...

"जो असतो पण दिसत नाही तो देव, जे दिसतं पण असत नाही ते भुत!"

"मानवी मन" ! या मनाला अभ्यासण्यासाठी जगातल्या मोठमोठ्या तत्ववेत्त्यांनी, महापुरूषांनी मोठ मोठे ग्रंथ लिहीले, महाकाव्ये लिहीली. "मानसशास्त्र" नावाचे एक स्वतंत्र शास्त्र उदयास आले. आणि या सगळ्यांनी शेवटी निष्कर्ष काय काढला तर मानवी मन हे अथांग आहे, अपार आहे. ज्याचा थांग घेणे शक्यच नाही. आणि त्या मानवी मनाबद्दल आमची अडाणी, अशिक्षीत बहिणाई सहज, अगदी साध्या शब्दात सांगून जाते....





No comments:

Post a Comment