संवाद

मराठी अभिमानगीत


कै. श्री. सुरेश भट

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी !

स्व. सुरेश भटांची ही सुरेख कविता गेली कित्येक वर्षे मराठी रसिकांना भुरळ घालत आली आहे. पण  आज किती जण मराठी भाषे विषयी, तिच्या संवर्धनाविषयी जागरूक आहेत?  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर, १०८ हुतात्म्याच्या बलिदानाचे फ़लीत म्हणून आज मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईत महाराष्ट्र कितीसा शिल्लक आहे? सकाळी दारात येणारा दुधवाला, भाजीवाला, इमारतीचा सुरक्षा रक्षक जिथे पाहावे तिथे अमराठी भरलेले. त्यामुळे मनात असुनही मराठी बोलता येत नाही...
मुळात स्वत:ला मराठी म्हणवणारा तथाकथित महाराष्ट्रीय माणुसच..."यु नो आय ऒलवेज लाईक टू स्पीक इन मराठी, पण त्याचं काय आहे ना, आय कॆन फ़ाईंड ऒल द अमराठी पिपल अराऊंड ना. सो कांट स्पीक मराठी.".... असली कारणे देवून मराठीदेखील इंग्रजीमधून बोलतो. लहान मुल पहिला शब्द बोलायला शिकते... तो शब्द आज काल "आई" नसुन "मम्मी" असतो.....!
मुळात मराठी माणसाच्याच या अशा दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे मराठीच्या वाट्याला कायम अवहेलनाच आली आहे आणि येते आहे. हे स्वरुप जर बदलायचे असेल तर एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. मराठीसाठी आपण मराठी भाषिकांनी एकत्र यायची आज जितकी गरज आहे तितकी यापूर्वी कधीच नव्हती. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.
श्री. कौशल इनामदारांनी आपल्या परीने अतिशय विधायक पद्धतीने या चळवळीला सुरूवात केली आहे. चला आपणही या चळवळीत सामील होवू या.
मराठी अभिमानगीताच्या रुपाने.......! सुरेश भटांच्या या शब्दांना कौशलजींनी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अदमासे ३००हुनही अधिक गायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्या्त आले आहे. मराठीतल्या सद्ध्याच्या जवळपास सर्व आघाडीच्या  गायक – वादकांचा यात सहभाग आहे.
विशेष म्हणजे या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च कुठल्याही एका प्रायोजकाकडून न घेता त्यासाठी कौशलजींनी अखंड महाराष्ट्रालाच आपल्या या स्वाभिमानी महत्वांकांक्षेत सामील करून घेतलं......
"  ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर या ध्वनिमुद्रणाचा खर्च निघू शकेल. यात तुमचा सहभाग असला तर मला आनंद होईल. हे काही नेहमीचं मदतीचं आवाहन नाही. हे आमंत्रण आहे – मराठीच्या चळवळीत तुम्ही सहभागी होण्याचं...."
या शब्दांनी मराठी रसिक भारावून गेला नसता तरच नवल..... ! या आमंत्रणाला न भुतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला आणि मग जन्माला आलं ते नितांत सुंदर मराठी अभिमान गीत....!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
(कै. श्री.  सुरेश भट)

कृपया चित्रावर टिचकी मारा
चित्राचा दुवा काम करत नसल्यास मराठी अभिमानगीत ऐकण्या-पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
मराठी अभिमानगीत..... याबद्दल बरीचशी माहिती कौशलदादांच्या या ब्लॊगवरही मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी आणि अभिमानगीताची ध्वनीफ़ीत मागवण्यासाठी , मागणी नोंदवण्यासाठी खालील दुव्यावर जा.
कौशलदादा, खुप खुप आभार या उपक्रमासाठी ! मन:पूर्वक अभिनंदन आणि लक्ष लक्ष शुभेच्छा पुढील संकल्पासाठी !
विशाल कुलकर्णी.

No comments:

Post a Comment