Wednesday, September 8, 2010

तू असा कसा रे..?

अधीर.., लाजर्‍या तरी बोचर्‍या
सख्या सोयर्‍या….,
…………………तू असा कसा रे..?

कधी पेरतो स्वप्ने हळवी
सखा साजिरा जणु असा
क्षणात येशी दारी माझ्या
क्षणात जाशी दुर कसा..?
…………………तू असा कसा रे..?

सदैव फिरशी चहू दिशा
धुंद समीरा, तू यार असा
जणु कलंदर, मस्त फकीरा
तरी सोबती मित्र जसा..!
…………………तू असा कसा रे..?

असाच येना मनात माझ्या
राहून बघ तू श्वास जसा
जरी न मानवे बंधन तुजला
थांब जरा तू आभास जसा
………………..तू असा कसा रे..?

मैत्र आपुले ‘अक्षय ठेवा’
युगा युगांचा साथ तसा
आज इथे अन उद्या तिथे
असशी तरी समीप असा
…………………तू असा कसा रे..?

माझा बालपणीचा मित्र ‘सुबोध म्हसकर’ ! हा माणुस आयुष्यभर उन्मुक्त वार्‍यासारखं आयुष्य जगत आला आहे. सदैव कुठल्या ना कुठल्या एन.जी.ओ. साठी, कधी एखाद्या अनाथाश्रमासाठी, कधी महिलाश्रमासाठी, तर कधी रस्त्यावरच्या अनाथ भटक्या मुलांसाठी मदत गोळा करत देशभर फिरत असतो.

कधी अचानक रात्री-बेरात्री फोन येतो, विशल्या मी अमुक अमुक बस स्टंडवर आहे, मग ते कधी परळ असते तर कधी मुंबई सेंट्रल तर कधी मुंबईतले अन्य कुठले. त्याला वेळ असेल तर घरी येतो नाहीतर मी तिथे जातो. आधी बायको कुरकुरायची, पण एकदा सुब्याची ओळख झाली आणि मग आपोआपच तिदेखील त्याची फॅन झाली. काल मैत्रीदिनानिमीत्त ठाणे गटगला हजर राहीलो. परतताना बायकोने विचारले…

“आज सुबोध कुठे असेल रे?”…

सुब्या, साल्या कुठे आहेस? तूला या मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा! तुझ्या सारखा मित्र मला जन्मोजन्मी लाभावा हिच त्या प्रभुचरणी प्रार्थना !

विशाल.

2 comments:

  1. आज इथे अन उद्या तिथे
    असशी तरी समीप असा......कविता छान आहे आणि ब्लॉग देखिल.

    ReplyDelete