Tuesday, October 8, 2024
माय गेली दूर गावा...
कोण येते कोण जाते ध्यान थोडे देत आलो
आसवांना नेहमी आव्हान थोडे देत आलो
या जगाला त्या जिवाचे वाटले ओझे कधी ना
ईश्वराला भावनांचे दान थोडे देत आलो
आज परके प्राण झाले वाढला नकळत दुरावा
सोयरे व्हावेत म्हणुनी भान थोडे देत आलो
विठ्ठला, कां गौण ठरते माणसाचे मौन येथे?
मी स्वतःला अक्षरांचे ज्ञान थोडे देत आलो
माय गेली दूर गावा थांबले घन उंबऱ्यावर
आटलेल्या पापण्यांना प्राण थोडे देत आलो
© विशाल कुलकर्णी
#आई
Monday, December 19, 2022
राहून गेले ...
बोललो ना मोकळ्याने सांगणे राहून गेले
जन्म सरता आकळे उपभोगणे राहून गेले
पाखरांशी बोलतो अन हासतो वेडा सुखाने
पण स्वतःशी बोलणे समजावणे राहून गेले
बुद्ध कोणी माणसाला प्रेम कां देवून गेला?
बद्ध या भिंतीत जगणे वाहणे राहून गेले
आर्त विश्वाचे जगाला सांगतो समजावतो मी
रोप सुकले अंगणी गोंजारणे राहून गेले
पडझडी त्या कोवळ्या रात्रीत एका सोसलेल्या
पेलतो ओझे क्षणांचे स्फुंदणे राहून गेले
थांब थोडे ऐक आता गीत माझे एकट्याचे
शब्द अडले आज ओठी बोलणे राहून गेले
© विशाल कुलकर्णी (१९.१२.२०२२)
Tuesday, April 12, 2022
ठीक आहे ...
अलिप्त
मात्र थोडे हासलो मी, ते म्हणाले ठीक आहे
दुःख माझे व्यक्त केले, ते म्हणाले ..., ठीक आहे!
काळजावर दगड ठेवुन, स्वप्न ओले ठेचले मी
आरसा नाराज झाला, ते म्हणाले ठीक आहे
कोणता तो गाव होता, डोंगराच्या पायथ्याला
दरड पडली श्वास सरले, ते म्हणाले ठीक आहे
वाढता उन्ह थांबला तो, झाड पाहुन सावलीचे
वीज पडली राख झाली, ते म्हणाले ठीक आहे
जगरहाटी सुरुच राहे, कोण येते कोण जाते?
चक्र ना थांबे कधीही, ते म्हणाले ठीक आहे
काळ तो दारी उभा घेवून जाण्या पैलतीरा
श्वास सरता समय थांबे, ते म्हणाले ठीक आहे
विशाल कुलकर्णी
Thursday, February 24, 2022
मोकळा पण मुक्त नाही...
मोकळा पण मुक्त नाही
मी तरी आसक्त नाही
शब्द आतुर ओघळाया
जाहलो पण व्यक्त नाही
देव, श्रद्धा, धर्म, भक्ती..
मान्य; पण मी 'भक्त' नाही
सांगतो मी गुज मनीचे
भाव आहे 'सुक्त' नाही
वाढते वय रोज केवळ
लोक म्हणती पोक्त नाही
विशाल उवाच...
Sunday, March 15, 2020
स्पर्श वेदनेचा...
तो मार्ग बंद अजुनी
होता तसाच आहे
वेडेपणा मनाचा
होता तसाच आहे
आश्वस्त जाणिवांची
सोबत उरी असावी
पट सुप्त आठवांचा
अजुनी तसाच आहे
नक्षत्र कोणते ते
डोळ्यात दाटलेले
पाऊस आसवांचा
संतत तसाच आहे
भाळावरी कुणाच्या
आभाळ टेकलेले
ओझे कशाकशाचे
त्रागा तसाच आहे
भेटीस रोज येतो
भुतकाळ माणसाचा
तो स्पर्श वेदनेचा
होता तसाच आहे
@ विशाल कुलकर्णी
Tuesday, December 10, 2019
गझल
कोण जाणे का तुला हे भावले आयुष्य आहे
वाट मी ही पाहिलेली अंतसमयाची सुखाने
कोणत्या त्या कारणास्तव लांबले आयुष्य आहे
मांडला बाजार कोणी कोंडलेल्या भावनांचा
कैक दुखऱ्या आठवांनी तुंबले आयुष्य आहे
उधळुनी देतोच आहे प्राक्तनाची बंधने मी
पण रुढींच्या चौकटीवर टांगले आयुष्य आहे
व्यर्थ अट्टाहास वेड्या मरण वेळा टाळण्याचा
स्वप्नओल्या पापण्यांना झोंबले आयुष्य आहे
© विशाल कुलकर्णी
Monday, September 2, 2019
गझल
अंबराचा अन धरेचा आगळा अनुराग आहे
त्या दिशेला आजही बघ पेटलेली आग आहे
तो तसा दोषी नसावा मोजका सहभाग आहे
धर्म नामक जोखडाचा हा विनोदी भाग आहे
अन सुखांच्या वल्गनांचा मज मनस्वी राग आहे
हासलो मी यार खोटे..., काय हा वैताग आहे?
लाख गुन्हे रोज करतो मी तरी बेदाग आहे
गझल
मेघ होवुन या धरेवर बरसलो मग
आसवांचे कढ़ होवुन साठलो मग
मी मलाही नेमका कळलोच नाही
आरशाला मीच तेव्हा हासलो मग
ते म्हणाले आज तू माणूस झाला
त्याच वेळी मी जरासा बाटलो मग
तोच रस्ता तीच वळणे तोच मीही
कोण जाणे मी कशावर भाळलो मग
चित्रगुप्ताच्या वहीवर शुन्य होते
त्यास बहुदा मी त्रिशंकू भासलो मग
अंबरावर थुंकलो अन हासलो मी
'त्यांस' ही त्यांच्यातला मी वाटलो मग
© विशाल कुलकर्णी
गझल
आरशाला मीच बहुदा आपलासा वाटलो
टाळले त्यांनीच जेव्हा ओळखीचे वागणे
मीच मजला यार तेव्हा मोकळासा भासलो
पुस्तकेही चाळलेली ज्ञान थोडे शोधण्या
राबलो रानात जेव्हा, तज्ञ खासा जाहलो
पंचगंगेच्या तिरावर नांदली माणूसकी
मी इथे सागरकिनारी कोरडासा वागलो
पावश्याची शीळ ऐकुन मेघही येती म्हणे
काल त्याला पाहुनी मी घाबरासा जाहलो
काय झाले थुंकले तोंडावरी माझ्याच ते?
मीच थोडा शरमलो अन बावळासा वाटलो
© विशाल कुलकर्णी
Thursday, December 13, 2018
वाचताना माणसांना नेहमी चुकतो अताशा
वळण येता थांबतो अन सोडतो हलके उसासा
आरशाला वाटले भांबावलो आहे कदाचित
मी म्हणालो आरशाला बोल ना खोटे जरासा
लावतो प्राजक्त दारी वाट मी बघतो सुखाची
लागता चाहूल त्याची मीच होतो मोगरासा
एक झाली चूक हातुन पदर बघ सांभाळताना
ते म्हणाले हा तिचा तर रोजचा आहे तमाशा
भाकरीची याद व्याकुळ शोधते पडसाद कुठले?
पाशवी अवकाश उरतो भूक बनुनी मोकळासा
रेखतो भिंतीवरी मी खूण माझ्या दिनक्रमाची
रोज संध्याकाळ होते दिवस होतो सावळासा
माणसांना मोजताना फक्त डोकी मोजली मी
वाचताना माणसांना नेहमी चुकतो अताशा
मात्र सांभाळूत ओझे आवडीने आठवांचे
पाखरे येतील परतुन मग सुखांचा कर खुलासा
© विशाल कुलकर्णी
Thursday, November 29, 2018
गज़ल
बीज आहे मी मला हो यायचे उगवून पुन्हा
श्रान्त रस्ता थांबलेला वळण बघता ते नव्याने
मागुती मी का न जावे पाउले वळवून पुन्हा
थांब थोडे आज येथे बोल माझ्याशी सुखाने
हौस हसण्याची जराशी घेवुदे पुरवून पुन्हा
मी तरी केव्हा जगाची काळजी केली खरोखर
एकट्याने भोगलेले दुःख मी ठरवून पुन्हा
दोन श्वासातील अंतर मोजण्याचा हट्ट कसला
कोवळ्या श्वासांतली हुरहूर घ्या उसवून पुन्हा
एकदा सांगेन म्हणतो मी तुलाही स्वप्न माझे
भांडतो मग प्राक्तनाशी भान मी हरवून पुन्हा
© विशाल कुलकर्णी
Wednesday, October 3, 2018
गज़ल
रेशमी खंजीर म्हणुनी काळजात खुपसुन बघतो
फसवते आयुष्य सगळे एकट्याने रुसुन बघतो
ती म्हणाली एकदा तर भेटुया की नदिकिनारी
नेहमीचा खेळ आहे मी तरीही फसुन बघतो
चंद्र तारे काजवे अन लोचनांच्या लाख ज्योती
काजळी माझ्या मनाची मी जराशी पुसुन बघतो
मी बिगारी प्राक्तनाची मग सुखाने रोज करतो
वास्तवाच्या टाचणीने फुटुनही मी हसुन बघतो
देव कोणी काळजी घेतो म्हणे माझी-तुझीही
मी स्वतःला मुक्तहस्ते अंबरात उधळुन बघतो
जन्म मृत्यू खेळ सारा कोण माझा कोण परका
मी स्वत:शी भांडताना रोज पक्ष बदलुन बघतो
© विशाल कुलकर्णी
Friday, September 7, 2018
तू नव्याने एकदा भेटून जा
पापण्यांच्या कोपऱ्यावर बांध तू घालून जा
पौर्णिमेचा चंद्र आणिक काजव्यांचे ताजवे
झूठ सारे तू नव्याने एकदा भेटून जा
सोडवूनी यार थकलो प्रश्न जगण्याचे किती
उत्तरांच्या संदुकीची झाकणे खोलून जा
माणसे बेताल झाली कायदा होता नवा
तत्व समतेचे जगाला आज समजावून जा
तू तरी कुठवर पुरा पडशील बाबा ईश्वरा
एकदाचे माणसाला सत्य तू सांगून जा
© विशाल कुलकर्णी
Tuesday, September 4, 2018
...... मिटून डोळे
पहात असतो परवड सगळी मिटून डोळे
सहन करावी तडफड सगळी मिटून डोळे
नभात असतो म्हणे कुणी देव जागलेला
करत रहावी धडपड सगळी मिटून डोळे
मनास कळते मुकेपणाची अबोल भाषा
उगाच का हो बडबड सगळी मिटून डोळे?
कुणास ठावे कधी अचानक दिसेल मृत्यू
उरात तोवर धडधड सगळी मिटून डोळे
उपासपोटी कुणी छकूली मुकाट बसते
कशी सहावी रडरड सगळी मिटून डोळे
उभा विटेवर विठू कधीचा उदासवाणा
पहात राही पडझड सगळी मिटून डोळे
© विशाल कुलकर्णी
Wednesday, August 29, 2018
भिंती
बांगड्या फुटतील तेव्हा एकट्या होतील भिंती
माणसे मग मौन धरतिल पोरक्या होतील भिंती
कोरडा हा गाव येथे मोगराही लाल असतो
बघ जरा हासून तूही बोलक्या होतील भिंती
रंग रक्ताचा सदा आरक्त असतो सत्य आहे
हात पसरुन साद दे मग मोकळ्या होतील भिंती
देव असतो आणि नसतो, माणसे असतील सोबत
तू जरा माणूस हो मग सोयऱ्या होतील भिंती
खोल दरवाजे मनाचे अंतरीच्या शोध सत्या
विरघळावे द्वैत सारे दार त्या होतील भिंती
© विशाल कुलकर्णी
Friday, June 22, 2018
गाऱ्हाणे ...
सदा पावसाचे उगी ते रहाणे
कसे आवरू मी पुन्हा त्या उन्हाला
तुझ्या सावलीचे किती हे बहाणे
नभाला कसे सांग मी रागवावे
रुसावे तरी हासते ते शहाणे
सुगंधास ना स्तब्धता भावते रे
जिथे जाय वारा तिथे ते वहाणे
कधी गंध मातीस धुंदावणारा
कधी पावसाचे सुगंधी तराणे
फुकाचे बहाणे किती ऐकवावे
विशाला स्वतःला किती ते पहाणे
© विशाल कुलकर्णी
Tuesday, May 22, 2018
गज़ल
किती रापलो राबताना समजले नसावे
घराला जल तिचे कधीही बिलगले नसावे
एकांतात रमणे फिरस्त्यास पटले नसावे
मला कोरडे ढेकर कधीच पचले नसावे
तया आरसा पाहणे नित्य जमले नसावे
Thursday, May 10, 2018
चांगला म्हणतील ते .....
पुस्तकांचे त्या मलाही वाचणे मंजूर आहे
सावलीलाही कुणी ना थांबते माझ्या अताशा
सभ्य मी, पण सावलीचे वागणे मगरूर आहे
एकटेपण खायला उठते जरी आता नव्याने
भोवती माझ्या जगाचे रेंगाळणे भरपूर आहे
प्रश्न हा नाहीच की असतील का ते सोबतीला?
पासुनी माझ्याच माझे राहणे बघ दूर आहे
वागणे माझे मला नाही जरी कळले कदापी
चांगला म्हणतील ते पण वाटणे बदनूर आहे
घोळके हे माणसांचे टाळती का रोज आम्हा?
त्रास होतो पण तरीही हासणे मजबूर आहे
© विशाल कुलकर्णी
Wednesday, April 18, 2018
माणसांना पारखावे मी कसे ?
काळजाचे प्रश्न अवघड समजवावे मी कसे?
कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां,
जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे?
हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे,
रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?
ऐक वेड्या ओळखीचे चोर दिसती साजरे
या घडीला माणसांना पारखावे मी कसे ?
स्वार्थ सत्ता द्वेष मत्सर माणसांचे सोयरे
बंधुभावाचे नगारे वाजवावे मी कसे ?
शांतचित्ताने विशाला आळवावे राघवा
दांभिकांचे दंभ फुसके जोजवावे मी कसे?
© विशाल कुलकर्णी
Sunday, April 1, 2018
रडे रोज चंदन सहाणे सवे
***********************
पुन्हा काजव्यांचे शहाणे थवे
सखे चंद्र गातो तराणे नवे
मला आज सोबत दिवाणे हवे
रडे रोज चंदन सहाणेसवे
वळुन उंबऱ्याला पहाणे नवे
मला मायसंगे रहाणे हवे
तुला ऐरणीचेच गाणे हवे