Monday, December 19, 2022

राहून गेले ...

 बोललो ना मोकळ्याने सांगणे राहून गेले

जन्म सरता आकळे उपभोगणे राहून गेले


पाखरांशी बोलतो अन हासतो वेडा सुखाने

पण स्वतःशी बोलणे समजावणे राहून गेले


बुद्ध कोणी माणसाला प्रेम कां देवून गेला?

बद्ध या भिंतीत जगणे वाहणे राहून गेले


आर्त विश्वाचे जगाला सांगतो समजावतो मी 

रोप सुकले अंगणी गोंजारणे राहून गेले


पडझडी त्या कोवळ्या रात्रीत एका सोसलेल्या

पेलतो ओझे क्षणांचे स्फुंदणे राहून गेले


थांब थोडे ऐक आता गीत माझे एकट्याचे

शब्द अडले आज ओठी बोलणे राहून गेले


© विशाल कुलकर्णी (१९.१२.२०२२)

Friday, August 12, 2022

मी झेंडा घेतला नाही...

 संदीप खरेंची क्षमा मागून...


आमची प्रेरणा : मी मोर्चा नेला नाही आणि... ते सांगायलाच हवं का?


मी झेंडा घेतला नाही, मी लालसिंग पाहिला नाही

मी फेसबुकवर ही साधी, कधी पोस्ट टाकली नाही


भवताली भंगार-चाळे, पॉपकॉर्न घेवून बसताना

कुणी पोस्टीतून चिडताना, कुणी कमेंटून पिडताना

मी तटस्थ राहूनी भिजलो, कुंपणावर बसुनी जेव्हा

शिव्या द्यावया देखिल, कुणी मला निवडले नाही


संन्यस्त खोड मी आहे, मूळ फांद्या वठल्या जेथे

राजकारणात पकला गेलो, गुर्मीत झाडले कपडे

पण पोस्टीतून कुठलीही, चिडल्याची चिन्हे नाही

कुणी निषेध केला नाही, बॉयकॉटही केला नाही


फसलेला लालसिंग चढ्ढा, ते बटबटीतसे डोळे

सत्ता पाहुनी फिरती ईडी तोफेचे गोळे

मी शिवसेनेला भ्यालो, मी बीजेपीला भ्यालो

मी मनात ही काकांशी, कधी पंगा केला नाही


मज जन्म दुसरा मिळता, मी शब्द जाहलो असतो

मी असतो जर का शाई, तर थिजून गेलो असतो

मज लिहिता लिहिता कोणी, चिडले तडफडले नाही

मी क्रिटिक झालो नाही, मी भक्तही झालो नाही


मी झेंडा घेतला नाही, मी लालसिंग पाहिला नाही

मी फेसबुकवर ही साधी, कधी पोस्ट टाकली नाही


-- जूनाच इडंबनकार इरसाल सोलापूरकर

Monday, July 4, 2022

पावसाळा

 पावसाळा


शोधतो आहे कधीचा आतला मी पावसाळा

शोधताना मग स्वतःला मीच होतो पावसाळा


मी उन्हाची साथ नाही आजही बघ सोडलेली 

कोणत्या वळणावरी मज भेटलेला पावसाळा?


दिवस सरतो, रात्र होते, स्वप्न ओले जीव पाहे 

मात्र त्या डोळ्यात का हो, थांबलेला पावसाळा?

  

विरघळावे मळभ सारे दंभ सगळा ओघळावा

स्पर्शतो गात्रांस साऱ्या आर्जवी मग पावसाळा


वृक्षगर्भी तेज हिरवे सोनपिवळा वर्ख ल्याले 

झिरपला आनंद बनुनी लाघवी बघ पावसाळा


© विशाल कुलकर्णी