Sunday, December 23, 2018

मोरपीसे


मोरपीसे

जगण्याचे संदर्भ अस्पष्ट व्हायला लागले
की नकळत मी ही..
कावराबावरा होवून जातो.
नेमकी त्याच वेळी कुठूनशी..
तुझी साद कानी येते.

नाही..., , म्हणजे...
अगदी प्रत्येक वेळी तुझी साद
मला स्पष्ट ऐकू येतेच असे नाही.
पण खरे सांगू ...
ती हलकीशी कुजबुज सुद्धा पुरेशी असते रे.
याची ग्वाही देण्यासाठी,
की तू आहेस तिथे, माझ्यासाठी !

मग नकळत मी सुद्धा
आठवणींचे ढिगारे उपसायला लागतो
आणि अलगद ...
आयुष्याच्या जुनाट फडताळात
कुठल्याश्या कोपऱ्यात दबून राहिलेली
एखादी जीर्ण वही हाती लागतेच...
जिच्या पाना-पानात
असंख्य मोरपीसे सापडत जातात.
आठवणींची, सुख-दुःखाची,
तुझ्या असण्याची, क्वचित.... नसण्याचीही !
माझ्यातला मी हळूवारपणे,
मलाच नव्याने भेटायला लागतो, सापडायला लागतो.

या मोरपीसांची सुद्धा एक गंमत असते बरं
दिसतात मोठी मुलायम ...
पण प्रत्यक्षात फार बोचरी असतात
आपल्या असण्यात ...
अनेक नसण्याचे संदर्भ बाळगून असतात.
त्यांच्या दिसण्यावर नको जावूस
तो मुलायम स्पर्श ...
कित्येक अनामिक धगींनी पोळलेला असतो रे
एक विनंती करू तुला?
यापुढे जेव्हा कधी त्या मोरपीसांना शिवशील
तेव्हा त्या धगीची सुद्धा जाणीव असू दे
मला नकोस सांगू हवे तर
पण एवढे लक्षात ठेव ...
किमान त्यांचे मुलायमपण शाबित ठेवण्यासाठी तरी !

© विशाल कुलकर्णी

Thursday, December 13, 2018

वाचताना माणसांना नेहमी चुकतो अताशा

चालताना पांथिकाला वाटतो रस्ता हवासा
वळण येता थांबतो अन सोडतो हलके उसासा

आरशाला वाटले भांबावलो आहे कदाचित
मी म्हणालो आरशाला बोल ना खोटे जरासा

लावतो प्राजक्त दारी वाट मी बघतो सुखाची
लागता चाहूल त्याची मीच होतो मोगरासा

एक झाली चूक हातुन पदर बघ सांभाळताना
ते म्हणाले हा तिचा तर रोजचा आहे तमाशा

भाकरीची याद व्याकुळ शोधते पडसाद कुठले?
पाशवी अवकाश उरतो भूक बनुनी मोकळासा

रेखतो भिंतीवरी मी खूण माझ्या दिनक्रमाची
रोज संध्याकाळ होते दिवस होतो सावळासा

माणसांना मोजताना फक्त डोकी मोजली मी
वाचताना माणसांना नेहमी चुकतो अताशा

मात्र सांभाळूत ओझे आवडीने आठवांचे
पाखरे येतील परतुन मग सुखांचा कर खुलासा

© विशाल कुलकर्णी
चांदणदाटी

चांदणदाटी

आठवणींचा चांदणशेला
सुखदुःखाच्या उन्हात ओला
संगत सुटली सुखही रुसले
सखे तुझा गं कृतक अबोला

कातळडोही दबली गाणी
मुग्ध प्रीतिची रम्य कहाणी
तू नसताना मनात माझ्या
अनाम खळबळ गहिरे पाणी

दिस सरताना गंध कुणाचा
मुकी पाखरे स्वर वाऱ्याचा
अशांत डोळी गाणे विरले
झुके पापणी स्वर विरहाचा

भेटीगाठी नदीकिनारी
दरवळलेल्या सुगंध लहरी
जगणे गाणे झाले अलगद
सुखदुःखाच्या आनंदसरी

वेशीवरच्या पारावरती
ओघळले आभाळ सभोती
पाय धुळीचे, खुणा कुणाच्या
तुझ्या सयींची चांदणदाटी

© विशाल कुलकर्णी